औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची सर्वत्र उलट सुलट चर्चा होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून उद्या दि. ८ शनिवार रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पुणे राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून दहावीच्या निकालाच्या तारखेविषयी सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले होते. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर राज्य मंडळाने निकालाची तारीख जाहीर केल्याने निकालाविषयीची उत्सुकता संपणार असून निकालाची विद्यार्थ्यांची प्रतिक्षाही आता संपली आहे.
यावर्षी १ ते २२ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली या पाच जिल्हयातील एकूण ६१६ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. विभागातून १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल...
१) www.mahresult.nic.in
२) www.sscresult.mkcl.org
३) www.maharashtraeducation.com